जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरात आज (दि.१८) एक महत्त्वाची कारवाई पोलीस वाहतूक शाखेच्या संयुक्त प्रयत्नाने झाली. जळगाव शहरातील विविध भागात नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 250 हून अधिक रिक्षा चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.
याबाबत असे की, आज बुधवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी शहरात ठीक ठिकाणी नाकाबंदी करीत पोलीस वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे नाकाबंदी करीत नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक, ज्यांच्याकडे बिल्ला नसणे, रिक्षा चालवण्याची परमिट नसणे, विनापरवाना गॅस किटवर वाहन चालवणे, पियूसी नसणे, इन्शुरन्स नसणे आणि जादा प्रवासी भरून वाहतूक करणे अशा गुन्ह्यांसाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांनी माहिती दिली की, “आतापर्यंत 250 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.” या कारवाईमुळे रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याची जाणीव करून देण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनाची तपासणी कठोरपणे केली जाईल आणि आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल.