ग्राहकांच्या खिशाला कात्री ; सुका मेव्याच्या दरात प्रतिकिलो ‘एवढ्या’ रुपयांची वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे बाजारपेठे विविध वस्तूंनी सजली सजली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाने चांगली तयारी केली आहे. दरम्यान, दिवाळीत घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या फराळाबरोबर मिठाईमध्ये प्रामुख्याने सुका मेवा वापरला जातो. मात्र, सुक्या मेव्यातील पिस्ता, खारीकच्या दरात प्रतिकिलो मागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दिवाळीत नातेवाईक, आप्तेष्टांना भेटवस्तू देण्यासाठी काजू, बदाम, अंजीर इत्यादींनी भरलेल्या आकर्षक बॉक्समध्ये मिळालेला सुका मेवा अनेक जण घेतात. मात्र, यंदा सुका मेवा बाजारात चांगलाच भाव खाणार आहे. कारण सुक्या मेव्यातील बदाम, काजूचे दर जरी स्थिर असले तरी पिस्ता, खारीकचे दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांनी वाढल्याने नागरिकांना यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
सध्या कार्यालय व कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सुका मेवा भेट देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दिवाळीपूर्वी सुक्या मेव्याच्या गिफ्ट पॅकेटची मागणी वाढू लागली आहे. दिवाळीत आरोग्याची काळजी घेत मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला नागरिकांकडून अधिक पसंती दिली जाते.