अटल करंडक एकांकिका स्पर्धेची १० डिसेंबरला प्राथमिक फेरी
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा, पनवेल आणि चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, पनवेल यांच्यातर्फे अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या एकांकिका स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव येथील समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे तालिम स्वरुपात ही प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीकरिता सांघिक प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिके रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तर दिग्दर्शन, लेखन, पार्श्वसंगीत, पुरुष अभिनय, स्त्री अभिनयाची प्रत्येकी दोन प्रथम व द्वितीय अशी पारितोषिके स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
पनवेल येथे महाअंतिम फेरी
प्राथमिक फेरीनंतर दि.२८, २९ व ३० जानेवारी रोजी या एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे रंगणार आहे. या महाअंतिम फेरीकरिता सांधिक प्रथम १ लाख रुपये व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व करंडक, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये व करंडक, चतुर्थ पारितोषिक १० हजार रुपये व करंडक व २ उत्तेजनार्थ पारितोषिके ५ हजार रुपये व करंडक देण्यात येणार आहे. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पार्श्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना प्रत्येकी प्रथम क्रमांक २ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक १५०० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक १ हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच २ उत्तेजनार्थ ५०० रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. जळगाव केंद्रावर होणाऱ्या या प्राथमिक फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजक विशाल जाधव व मुख्य आयोजक आ.प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.