जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । राज्यात मान्सून पाऊस खोळंबला असून शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोकणात मान्सून पुढे सरकण्यासाठी अद्यापही परिस्थिती अनुकूल नसून 22 जूननंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 23 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलाय. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे रविवारी जळगावातील तापमानात घट झालेली दिसून आली. मात्र आद्रता वाढल्याने उकाडा कायम होता.
बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. मान्सूनची वाटचाल रत्नागिरी आणि गोव्यापर्यंत मर्यादीत राहिली. बिपरजॉय चक्रिवादळामुळे 11 ते 18 जूनपर्यंत मान्सूनची वाटचाल संथगतीनं सुरू होती. मात्र आता बिपरजॉयचा प्रभाव कमी झाल्यानं मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि इतर प्रदेश व्यापण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आलाय. मान्सूनला विलंब झाल्यानं यंदा त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पेरण्याला विलंब होत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
दरम्यान, जळगावात सध्या ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून गुजरात राजस्थानातून पुढे सरकल्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात काही अंशी घट झाली आहे. रविवारी जळगावातील तापमान ३९ अंशावर होते. वादळ जसजसे संपेल तसतशी आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे उकाडा वाढणार असून येणाऱ्या दोन तीन दिवसात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.