जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२४ । एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला ह्दयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आलीय.
ठाकरे गटाचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज सकाळी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर तातडीने कार्यकर्त्यांनी त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रभाकर सोनवणे हे आज गुरुवारी सकाळी चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असतांना तालुक्यातील ममुराबाद येथे त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांची तब्येत आता उत्तम असून येत्या तीन चार दिवसात प्रचारासाठी ते सक्रिय होतील, अशी माहिती त्यांचे सुपूत्र दिनेश सोनवणे यांनी दिली.
प्रभाकर सोनवणे यांना ऐनवेळी मिळाली उमेदवारी?
खरंतर चोपडा मतदारसंघातून ठाकरे गटाने आधी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने, तडवींची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपमधून आलेल्या प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी नुकतेच आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला असून ते आता प्रचारासाठी सक्रिय झाले आहे. मात्र यातच त्यांना ह्दयविकाराचा झटका आला.