⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आरोग्य केंद्रातील बेजाबदार प्रशासन; सर्पदंश झालेल्या तरुणीची उपचारासाठी फरफट

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना विषारी सर्पदंश झालेल्या तरुणीवर उपचार करण्यासाठी दोघांपैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबीयांची उपचारासाठी फरफट झाली. अखेर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करुन तिला धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गंगापुरी (ता. अमळनेर) पूजा कुमावत या तरूणीला शनिवारी दुपारी शेतात निंदणी करत असताना घोणस जातीच्या विषारी सापाने चावा घेतला. शेतकरी चंद्रकांत पाटील व मुलीची आईने पूजाला तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे नियुक्त असलेल्या डॉ. विशाल पवार व डॉ. जितेंद्र चव्हाण या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे डॉ. पवार यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क केला असता, त्यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले.

दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र चव्हाण यांना विचारणा केली असता, त्यांनी फोन वरूनच रुग्णाची माहिती घेत, ‘आमच्याकडे लस उपलब्ध नसल्याने तुम्ही अमळनेर ग्रामीण रूग्णालयात घेऊन जा’ असे सांगितले. मात्र, रुग्णाला संदर्भ पत्र देण्यासाठी एकही जबाबदार कर्मचारी आरोग्य केंद्रात नव्हता. दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर फोनवरूनच १०२ रुग्णवाहिकेने रूग्णाला अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्याचे आदेश डॉ. चव्हाण यांनी दिले.

अमळनेर ग्रामीण रूग्णालयात डॉ. आशिष पाटील यांनी प्राथमिक उपचार करुन धुळे शासकीय रुग्णालयात तत्काळ रवाना केले. सध्या पूजाची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पूजावर डॉक्टरांना योग्य उपचार करता यावेत, यासाठी ज्या सापाने तिला चावा घेतला होता, तो घोणस जातीचा मृत साप घेऊन तिचे कुटुंबीय फिरत होते. वास्तविक, ३६ गावांतील हजारो ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातच पूजाला ‘एएसव्ही’ची लस मिळणे आवश्‍यक होते.

मात्र, या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने व इतरही कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी संदर्भात योग्य नियोजन नसल्याने हे आरोग्य केंद्र अक्षरशः वाऱ्यावर असल्याची प्रचिती सर्पदंश झालेल्या पूजाच्या कुटुंबीयांना आली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साप किंवा विंचू चावण्याच्या संभाव्य घटना लक्षात घेता, या ठिकाणी पुरेसा योग्य तो औषधी साठा उपलब्ध ठेवावा, अशी मागणी होत आहे.

“माझ्या मुलीला ‘घोणस’ जातीचा विषारी साप चावल्याने तिला आम्ही पातोंडा प्राथमिक केंद्रात उपचाराकरीता आणले. मात्र, डॉक्टरच उपस्थित नसल्याने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलवले. या ठिकाणी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही. त्यांनी धुळ्याला रवाना केले. या दरम्यान माझ्या मुलीच्या जिवावर बेतले असते तर? आपल्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.”