जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून राजकीय तयारीला वेग आला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत यंदा संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात हाेण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रशासकीय तयारी नाेव्हेंबरपासून सुरू हाेईल. नाेव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती गटांचे राजकीय आरक्षण साेडतीद्वारे जाहीर केले जाईल. मतदार यादी तयार करणे आणि अन्य प्रक्रिया सुरू हाेईल. फेब्रुवारीत प्रत्यक्ष निवडणूक हाेऊ शकते. त्यामुळे हा अंदाज बांधून इच्छुक उमेदवारांकडून राजकीय तयारीला वेग आला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर येणार गती
इच्छूक उमेदवारांकडून गटांचे संभाव्य आरक्षणाचा अंदाज बांधून तयारी केली जात आहे. गटांमध्ये भेटीगाठी, कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. अनेक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सध्या गटांमध्ये तळ ठाेकून आहेत. पाच वर्षांत केलेल्या कामांची उजळणी उमेदवारांकडून केली जात आहे तर शेवटच्या टप्प्यात गटांमध्ये वाढीव निधीची कामे करण्याकडे काही सदस्यांचा कल आहे. पुढील महिन्यात आरक्षण साेडत निघाल्यानंतर या राजकीय हालचालींना गती येणार आहे.