जळगाव लाईव्ह न्यूज । मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन (सिंथेटिक) मांजाच्या विक्री व वापराविरोधात पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून यावर्षी केवळ मांजा जप्तीपुरती कारवाई न करता भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल होईल. या पार्श्वभूमीवर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पाच विक्रेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नायलॉन मांजा मानवी जीव, पशुपक्षी व सार्वजनिक सुरक्षेस अत्यंत घातक आहे. यामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. विक्री करणाऱ्याला या धोक्याची पूर्ण जाणीव असूनही ते केवळ फायद्यासाठी असा मांजा विक्री करतात. हा गुन्हा ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ या सदरात येतो. त्यानुसार कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. हा गुन्हा अजामीनपात्र असून कठोर शिक्षेची तरतूद आहे.

दरम्यान, नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा घेऊन देऊ नये. नायलॉन मांजा तुटत नाही, त्यामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात. तसेच विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो.

आपल्या परिसरात कोणीही नायलॉन मांजाची विक्री करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.




