जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । लाच मागणी प्रकरणात आपल्यावर ट्रॅप (सापळा) आल्याची कुणकुण लागताच धरणगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेला मात्र अमळनेरातील रहिवासी असलेला पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे याने तक्रारदाराच्या खिशातील डिजिटल व्हाईस डिव्हाईडर घेवून धूम ठोकली होती. पथकाने पाठलाग करूनही आरोपी मात्र त्यावेळी पसार झाला होता. एसीबी आरोपीच्या मागावर असलीतरी आरोपी मात्र गुंगारा देत होता. 27 रोजी आरोपी जळगावच्या बहिणाबाई उद्यान परीसरात आल्याची गोपनीय माहिती कळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
व्हाईस डिव्हाडरसह पळाला होता आरोपी
धरणगाव पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात न्यायालयात चार्जशीट (दोषारोपपत्र) पाठवल्यानंतरही शिक्षा होणार नाही म्हणून 19 हजारांची लाच पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे याने मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार व आरोपी बोलत असताना आरोपीला आपल्यावर आलेल्या ट्रॅपचा अंदाज आला व त्याने तक्रारदाराच्या खिशातील डिजिटल व्हाईस डिवाईडर घेवून धूम ठोकली. एसीबी पथकातील अधिकारी आरोपीच्या मागे धावले मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला होता. या प्रकरणी आरोपीविरोधात 8 मार्च 2021 रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगावात आरोपी येताच आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस नाईक विलास सोनवणे पसार होता. गुरुवार, 27 मे रोजी एसीबी जळगाव युनीटमधील हवालदार दिनेशसिंग पाटील यांना आरोपी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.