जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह (Mandakini Khadse) इतर ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत या ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे दूध संघाचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचल्याचे दिसत आहे.
यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली आहे. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, जळगावात एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीष महाजन यांचा संघर्ष काही नवा नाहीयं. भाजपात असताना देखील एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यात सर्वकाही अलबेल कधीच नव्हते. गिरीष महाजन यांना देवेंद्र फडणवीस यांचा फुल्ल सपोर्ट कायमच राहिला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. भाजपासोडून जाताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, अजूनही खडसे आणि महाजन यांच्यातील संघर्ष थांबलेला दिसत नाहीयं.