⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | पोलीस भरती २०२२ : उमेदवारांसाठी महत्वाच्या कागदपत्रांची ‘अशी’ आहे यादी

पोलीस भरती २०२२ : उमेदवारांसाठी महत्वाच्या कागदपत्रांची ‘अशी’ आहे यादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने मोठी दिवाळी भेट दिली आहे. राज्य सरकारकडून १४ हजार ९५६ रिक्त पदांसाठी पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रिया जाहीर असून दि.३ नोव्हेंबर २०२२ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून त्यात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. उमेदवारांची सर्वप्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. पोलीस भरतीचा अर्ज केल्यापासून लेखी परीक्षेपर्यंत उमेदवारांना काही कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. महत्वाच्या कागदपत्रांची यादी आम्ही आपल्यासाठी देत आहोत.

पोलीस भरतीसाठी नमुद केल्यानुसार मूळ प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती या कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहणार आहे. यादीमध्ये खालीलप्रमाणे कागदपत्रांचा समावेश असणार असल्याने उमेदवारांनी आतापासून जुळवाजुळव केल्यास पुढील मार्ग सुकर होणार आहे.

शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र. जन्म दाखला.
१२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त /३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
आधारकार्ड (ऐच्छीक).
प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे. उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले ५ पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
हे देखील वाचा : पोरांनो तयारीला लागा.. महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया जाहीर, वाचा केव्हा आणि कुठे करणार अर्ज

उमेदवार मागासवर्गीय असूनही खुला प्रवर्ग (Unreserved) म्हणून अर्ज सादर करतात. परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र / नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करुन मागास प्रवर्गाचे लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतात. यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत. जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे. एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे आवेदन अर्ज भरावेत, नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, संबंधित बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र पडताळणीत सादर करावी.

कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरती प्रवेशपत्राची (हॉल तिकिटाची) प्रिंट व आवेदन अर्जावर सादर केलेले ५ पासपोर्ट साईज अलीकडील फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. विहित केलेली आवश्यक ती प्रमाणपत्रे त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.

आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही. आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.