जळगाव शहरात गोळीबार ; आठ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । जळगाव शहरातील शिवाजीनगरमधील के. सी. पार्क परिसरात गुरुवारी सायंकाळी गोळीबार झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींची धरपकड करून अटक केली.
पहिल्या फिर्यादीत, शुभम अशोक माने (वय २८, रा. के. सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याने म्हटले आहे कि, गुरुवारी २७ जुलै रोजी रात्री ७. ३० ते ८ वाजेदरम्यान संशयित आरोपी लखन दिलीप मराठे ऊर्फ गोलु रा. शिवाजीनगर हुडको, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे दोन्ही रा.हमालवाडा शिवाजीनगर, उमाकांत दत्तात्रय धोबी रा.संत मीराबाई नगर, समीर शरद सोनार रा. फॉरेस्ट कॉलनी, राजेश बंटी सदाशिव बांदल रा. उस्मानिया पार्क, चेतन रमेश सुशीर रा.मीराबाई नगर, महेश मराठे रा. हुडको, शिवाजीनगर, व आणखी एक यांनी आपसात कट रचुन फिर्यादी यास जिवे ठार – मारण्याची भिती घालुन खंडणीची मागणी केली. फिर्यादीकडुन संशयित आरोपी महेश मराठे याने त्याचे खात्यावर फोनपे च्या माध्यमातुन ६८,५००/-रुपये खंडणी स्विकारली.
तसेच गुरुवारी फिर्यादीकडुन पैसे मागण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी फिर्यादीचे घराबाहेर प्राणघातक शस्त्रासह गैरकायद्याची मंडळी जमा करुन फिर्यादीचे घरावर दगडफेक केली. फिर्यादीचे घराचे नुकसान केले व फिर्यादीस शिविगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्याचे घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन संशयित आरोपी लखन मराठे याने त्याचेकडील बंदुकीने फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी मारुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय रविद्र बागुल हे करीत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत, चेतन रमेश सुशीर (वय १९, रा. खोटे नगर, जळगाव) याने शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे कि, २७ जुलै रोजी रात्री ७. ३० ते ८ वाजेदरम्यान यातील फिर्यादी व साक्षीदार उमाकांत धोबी यांनी संशयित आरोपी शुभम माने यास काही महिन्यापुर्वी ८० हजार रुपये दिले होते. परंतु तो ते परत करीत नव्हता. म्हणुन फिर्यादी चेतन हे उमाकांत यांचेसह संशयित शुभम याचेकडे पैसे मागण्यास गेले असता,पैसे परत करणार नाही. पैसे मागितले तर जिवे ठार मारील असे म्हणुन शिविगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच शुभम माने याने त्याचेकडील बंदुक फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने रोखली. तेव्हा दुसरा संशयित मयूर माने याने, यांची लय कटकट झाली. त्यांना जिवंत ठेवु नको अशी चिथावणी दिल्याने संशयित शुभम माने याने फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने २ गोळ्या झाडल्या व त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन गुन्हा दाखल झाला आहे. एपीआय रविद्र बागुल हे तपास करीत आहेत. शुभम अशोक माने वय-२५, मयुर अशोक माने वय-३०, दोन्ही रा. के.सी. पार्कचे समोर त्रिभुवन कॉलणी, कानळदा रोड यांना अटक केली आहे.