पर्यावरण संवर्धनासाठी मेहरुण भागात वृक्षारोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । जळगाव मेहरुण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तथा जागतिक पर्यावरण दिनी विविध ठिकाणी वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने जन्मदिनाच्या सदिच्छा देण्यात आल्या.
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. तसेच मेहरूण हा भाग निसर्गरम्य करण्याच्या दृष्टीने नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी हा उपक्रम हाती घेतला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे हे उपस्थित होते.
यावेळी महापौर जयश्री महाजन या म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. मेहरुणच्या नागरिकांनी झाडे वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मानसिंगआप्पा सोनवणे, सलमान खाटीक, जाकिर पठाण, विलास भदाणे, शरीफ खाटीक, पूनम राजपूत, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.