जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । इंधन दरवाढीने मागील दोन महिन्यात देशात महागाईचा भडका उडाला आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात इंधन दरवाढीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. देशभरातील अनेक शहरांमधील पेट्रोल दर १०० रुपयाच्या वर गेल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याचा तयारीत आहेत.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याचा महत्वाचा निर्णय कच्च्या तेलाची उत्पादक संघटना ‘ओपेक’ आणि इतर सहयोगी देशांनी घेतला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भारतात देखील त्याचे परिणाम दिसून येतील.
सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही विक्रमी पातळीवर आहेत. पेट्रोल झपाट्याने ११० रुपयांच्या दिशेने तर डिझेल शंभरीच्या दिशेने कूच करत आहे. ‘ओपेक’ आणि रशियासह इतर तेल उत्पादकांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज चार लाख बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टपासून उत्पादनात वाढ होणार असून ती डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. २० लाख बॅरल प्रती दिन या क्षमतेपर्यंत ही उत्पादन वाढ सुरु राहणार असल्याचे ओपेकने म्हटलं आहे.
जळगावातील पेट्रोल-डीझेल दर
आज जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. दरम्यान, जळगावमध्ये जुलै २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०६.०७ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०८.९८ रुपये पर्यंत आहे. जळगावात एका महिन्यात पेट्रोल दरात तब्बल ४ रुपयाहून अधिकने दर वाढले आहे. तर डीझेल दरात ३ रुपयाहून अधिकने वाढले आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात १६ वेळा उसळी पाहायाला मिळाली होती.