⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावकरांची दिवाळी कचऱ्यात टाकणाऱ्या ‘वॉटरग्रेस’समोर लोकप्रतिनिधींनी टेकले गुडघे!

जळगावकरांची दिवाळी कचऱ्यात टाकणाऱ्या ‘वॉटरग्रेस’समोर लोकप्रतिनिधींनी टेकले गुडघे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. वॉटरग्रेसला मक्ता देण्यापासूनच जळगाव मनपातील सत्ताधारी सदस्यांमध्ये एकमत नव्हते. जेमतेम एकमेकांची मनधरणी करीत वॉटरग्रेसवर एकमत झाले. एका मोठ्या नेत्याने त्यात मध्यस्थी केली. जळगाव शहरात काम सुरु केल्यापासूनच वॉटरग्रेसविरुद्ध तक्रारी सुरु झाल्या. कुठे हफ्तेखोरीचे आरोप देखील झाले. सरते शेवटी काय तर कुणीही वॉटरग्रेसचे काही करून घेतले नाही. सोशीक जळगावकर नेहमीप्रमाणे आजही त्रास सहन करीतच आहे. गुरुवारी झालेल्या विशेष सभेत देखील सर्व सदस्यांनी वॉटरग्रेसवर टीका केली मात्र फलित काय तर प्रशासनावर सर्वांनी खापर फोडले. जळगावकरांच्या हितासाठी लढण्यात लोकप्रतिनिधींना वॉटरग्रेससमोर गुडघे टेकावे लागताय असेच सध्या दिसतंय.

जळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस झपाट्याने होत असून नवनवीन वस्ती आणि नगर देखील वाढत आहे. जळगाव शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामासाठी मनपाचे कर्मचारी अपूर्ण पडत असल्याने दरवर्षी बाहेरील यंत्रणेच्या माध्यमातून स्वच्छता आणि कचरा संकलन करण्यात येत होते. काही वर्षापूर्वी प्रभागनिहाय पद्धत तोडून शहरातील कचरा संकलनासाठी एकमुस्त पद्धतीने मक्ता देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जळगावात निविदा प्रक्रिया राबविल्यावर वॉटरग्रेस कंपनीचे नाव निश्चित झाले होते.

जळगाव मनपाला कचरा संकलनासाठी मिळालेली वाहने देखील वॉटरग्रेसला देण्यात आली. मक्तेदार निश्चित झाल्यावर सुरु झाला खरा खेळ. सुरुवातीला थोडासा विरोध झाला, काही हौशेनौशे मैदानात उतरले. आंदोलने केली मात्र पुढे फलीत काय तर काही नाही. वॉटर ग्रेस कचरा नव्हे माती उचलते. वजन वाढविण्याचा प्रयत्न करून मनपाचा पैसा खाण्याचा वॉटरग्रेस करीत आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अनेकांनी तर कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले देखील होते. पुढे काय तर वॉटरग्रेसने कामगारांना पगार न दिल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केले. आजही अनेक कामगार नियमांचे पालन होत नसल्याचे दबक्या आवाजात बोलतात.

वॉटरग्रेसचे काम चांगले नाही, गल्लोगल्ली कचरा पडून आहे. स्वच्छता मानांकनात जळगाव शहर घसरले, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. अशा अनेक बाबी नगरसेवक जाहीरपणे बोलू लागले. सर्वच नगरसेवक, मनपा सदस्य, पदाधिकारी वॉटरग्रेसच्या विरोधात असताना त्यांचे काम सुरु तरी कसे? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. वॉटरग्रेस संदर्भात आजवर नगरसेवकांकडून कानाडोळा केला जातो, काहीतरी गौडबंगाल असल्याचे समाजमनात बोलले जात असून सध्या तेच खरे वाटू लागले आहे.

जळगाव शहराची जबाबदारी १ पालकमंत्री, १ खासदार, २ आमदार, १ महापौर, ७५ नगरसेवक, मनपा आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांवर आहे. १०० पेक्षा अधिक जबाबदार लोकप्रतिनिधी, अधिकारी जर जळगावकरांना ऐन सणासुदीच्या काळात स्वच्छता देऊ शकत नसतील तर त्यांचा असून देखील जळगावकरांना काय फायदा? वॉटरग्रेसविरुद्ध चर्चा रंगतात. टीका होते परंतु पुढे त्याचे काहीही होत नाही. अनेकांनी तर वॉटरग्रेस संदर्भातील इतर जिल्ह्यांचे संदर्भ देखील शोधून आणले परंतु त्याचा काहीही फायदा आजवर झालेला नाही. वॉटरग्रेसचे मनमानी काम सुरूच असून सर्वांनी त्यापुढे गुडघे टेकले आहेत.

जळगाव शहराच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी घेऊन समाजात वावरणारेच जळगावकरांना न्याय देऊ शकत नसतील तर जळगावकरांनी ही बाब लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. स्वच्छतेअभावी होणारे आजार आणि तर त्रासाचा सामना आज जळगावकर नागरिक करीत असले तरी होणारा त्रास देखील जनता लक्षात ठेवत आहे. अवघ्या १० महिन्यावर जळगाव मनपाची पंचवार्षिक निवडणूक असून तेव्हा जनताच या सर्वांचा जाब विचारेल हे मात्र निश्चित आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.