⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

विमान प्रवास : जळगावकरांची हैदराबादपेक्षा गोव्याला अधिक पसंती.. किती आहेत तिकीट दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली जळगाव विमानतळावरील विमानसेवा १८ एप्रिलपासून सुरु होत आहे. केंद्रांच्या उडान योजनेंतर्गत ‘फ्लाय ९१’ कंपनीने पुढाकार घेतल्याने जळगावातील खंडित विमानसेवा पुन्हा सुरू होत असून गोवा व हैदराबाद या दोन शहरांशी ही सेवा सुरु होत आहे. विमान प्रवासासाठी बुकिंगला १० दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून, जळगावकरांनी हैदराबादपेक्षा गोव्याला अधिक पसंती दिली असल्याचे दिसते आहे.

‘फ्लाय ९१’ या गोवा बेस विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून सेवा पुरवण्याची परवानगी मिळाली आहे. गोवा, हैदराबादची विमानसेवा १८ एप्रिलपासून सुरू करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तसेच मे महिन्यात पुण्याची विमानसेवा सुरू करण्याचा दावा कंपनीने केला आहे. ही विमानसेवा केंद्राच्या उडान योजनेतर्गत पाच टण्यातील आहे. विमानसेवेला १८ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात येणार आहे.

यासाठी कंपनीच्या संकेतस्थळासह एजंटमार्फत बुकिंग घेतले जाते आहे. पहिल्या दिवशी जळगावातून गोव्याला जाण्यासाठी व गोव्याहून जळगावला येणाऱ्या दोन्हीकडील फ्लाइटच्या ७२ आसनांपैकी ५० आसन बुक झाले आहेत. तर हैदराबाद फ्लाइटचे २५ आसन बुक झाल्याचे कंपनीचे राष्ट्रीय विपणन प्रमुख यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, जळगावहुन हैदराबाद व गोव्याचे तिकीट १,९९१ रुपये इतके आहे. 

हैद्राबाद, गोव्यासाठी असे आहेत विमानसेवेचे वेळापत्रक
१८ एप्रिल ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोव्यावरून दुपारी २:२५ वाजता निघेल. दुपारी ४:१५ वाजता जळगाव विमानतळावर विमानाचे आगमन होईल, तसेच हैदराबादला सायंकाळी ४:३५ वाजता रवाना होईल. हैदराबादला ६:३० वाजता विमानतळावर आगमन होईल. हैदराबाद वरून संध्याकाळी ७ वाजता जळगावकडे उडाण करेल, तर रात्री ८:३५ वाजता जळगावला पोहोचेल. तर रात्री ८:५५ वाजता जळगाव वरून गोव्याला विमान निघेल, तर रात्री १०:०५ मिनिटाला गोव्याला विमान पोहोचेल. विमानसेवा सोमवार, गुरुवार, शनिवार असेल