जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । बिहारच्या पाटना येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक होळी स्पेशल एक्स्प्रेसच्या एसी डब्याला भीषण आग लागली. ही घटना दानापूर-पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या करिसठ स्थानकाजवळ घडली.
आग लागल्याचं कळताच ट्रेनमधील प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधूनच रुळावर उड्या घेतल्या. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत ट्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रेनला लागलेल्या आगीमुळे या मार्गावर इतर ट्रेनवर त्याचा परिणाम झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांचे हाल होत आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या रेल्वे पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेन बिहारच्या पाटना येथून मुंबईच्या दिशेने येत होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रेन करिसठ स्थानकाजवळ आली असता, अचानक ट्रेनच्या एका एसी बोगीला आग लागली. आग लागल्याचं कळताच ट्रेनमधील प्रवासी धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनच्या बाहेर उड्या घेतल्या. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, मोटारमनने या आगीची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलिसासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली? या शोध पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.