जळगाव लाईव्ह न्यूज । पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला घेरलं आहे. सिंधू कराराला स्थगितीसह भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून देश सोडण्याचे आदेश दिले.याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी निर्वासित कुटुंबांनी आपली व्यथा मांडली आहे.

पाकिस्तानातील असुरक्षितता आणि अत्याचारांना कंटाळून भारतात आलो असून, आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं कायमचं नागरिकत्व मिळावं, अशी त्यांची मागणी आहे.
जळगावमध्ये दीर्घकालीन व्हिसावर राहणाऱ्या अनेक पाकिस्तानी कुटुंबांनी सांगितले की, पाकिस्तानात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गॅस, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा आहेच, पण त्याहून अधिक जीवघेणी भीती आहे. एका नागरिकाने सांगितले, “आम्ही तिकडे ५० वर्षे राहिलो, पण संध्याकाळी ५ नंतर दुकान बंद करून भीतीने घरात बसावे लागायचे.”
अनेक महिलांनी सांगितले की, पाकिस्तानात महिला आणि मुली अजिबात सुरक्षित नाहीत. “बाहेर पडणेही मुश्कील होते. मुली-बाळींना उचलून नेले जाते. अशा दहशतीखाली आम्ही जगत होतो,” असे त्यांनी म्हटले. याच अत्याचाराला कंटाळून त्यांनी भारत गाठल्याचे स्पष्ट केले. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचे नागरिकत्व द्यावं, आमचे नातेवाईक तसे कुटुंब जे पाकिस्तानात आहे त्यांना सुद्धा भारतात घेऊन यावं, अशी मागणीही अनेक कुटुंबांनी केली आहे
चार ते पाच दिवसांपूर्वीच आमचे कुटुंबीय नूरी व्हिजा घेऊन पाकिस्तानात गेले, त्यातच पहलगाम येथील घटना घडल्यामुळे ते आता पाकिस्तानात अडकले आहेत, त्यांना पुन्हा भारतात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या बांधवांनी केली आहे. भारतात आम्ही, आमच्या महिला सुरक्षित आहोत जळगावात राहताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा त्या नरकात (पाकीस्तानात) जायचं नाही , अशा भावना या नागरिकांनी बोलून दाखवल्या.