जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । जामनेर तालुक्यातील पहुर येथे एका व्यापाऱ्याचे बंद घर फोडून सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ रोजी दाखल गुन्हा उघड करण्यात एलसीबीला मोठे यश आले आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश असून तिनेच टीप दिल्यावरून मामेभावाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला होता. इतकंच नव्हे तर चोरलेल्या दागिन्यांची विक्री न करता ते गहाण ठेवण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर येथील अनिल रिखबदास कोटेचा यांच्या घरात दि.२५ ऑगस्ट २०२१ ते दि.२८ ऑगस्ट २०२१ दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारला होता. बंद घर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराची कडी, कोंडा तोडून अंदाजे १२ लाख ६६ हजारांचे दागिने त्यात २ लाख ९० हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पहूर येथे धाडसी घरफोडी करणारे संशयित आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती काढून एकाच वेळी कारवाई करत सय्यद सरजील सय्यद हरून (वय-२७, रा. मास्टर कॉलनी जळगाव), अनिल रमेश चौधरी (वय-४०, रा. अयोध्या नगर जळगाव), सय्यद अराफत सय्यद फारूक (वय-३३, रा. तांबापूरा), सय्यद अमीन उर्फ बुलेट सय्यद फारुख (रा. तांबापुरा) आणि भावना जवाहरलाल जैन (लोढा) वय ४० रा. रायसोनी नगर, जळगाव या पाच जणांना ताब्यात घेतले केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मात्र चोरलेले दागिने इतरांकडे गहाण ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी १६ लाख ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बहिणीच्या टीपमुळे झाली घरफोडी, दागिने ठेवले स्वतःकडे..
पहुर येथे घरफोडी झाली होती ते अटकेतील संशयित भावना जैन हिचे मामेभाऊ आहेत. भावना ही काही दिवसांपूर्वी मामेभावाकडे पहूर येथे गेली होती. त्यानुसार भावना हिनेच तिच्या पतीसह त्याच्या मित्रांना पहूर येथील मामेभावाकडे भरपूर सोन्याचे दागिणे व रोख असल्याची माहिती दिली होती. मी स्वत: ते बघितले आहेत. ते सध्या गावाला गेले आहेत, कुलूप तोडून दागिणे व पैसे चोरी करा, आपण सर्व वाटून घेवू असे भावना हिने सांगितले होते. टीप मिळाल्यानंतर भावना जैन व इतरांनी कारने पहूर येथे जावून घर फोडले होते. यात दागिणे व रोकड असा मुद्देमाल लांबविला होता. चोरीनंतर सर्व संशयितांनी सोन्याचे दागिणे हे भावना जैन हिच्याकडे दिले होते, असे सांगत संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. रोख रक्कम वाटून घेत उर्वरित दागिने संशयितांनी गहाण ठेवून त्याची देखील रोकड केली होती. एलसीबीने अगदी शिताफीने गुन्हा उघड केला आहे.
पथकात यांचा होता समावेश..
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय हिवरकर, विजयसिंह पाटील, राजेश मेढे, सुधाकर अंभोरे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, अक्रम शेख, पोलीस नाईक संतोष मायकल, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, विनोद पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे, अश्विनी सावकारे आणि रूपाली खरे यांच्या पथकाने या लाखो रुपयांच्या या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे . तर सपोनी वसंत कांबळे, पोउनि सचिन डोंगरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना विनायक पाटील, पोना किशोर मोरे, पोना सचिन चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.