स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाणिज्य उत्सवाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागामार्फत 24 सप्टेंबर, 2021 रोजी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी ‘वाणिज्य उत्सव’ अर्थात निर्यातदारांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांनी दिली आहे.
निर्यातदारांचे संमेलन जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी 1.00 वाजता होईल. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होईल. खासदार रक्षाताई खडसे आणि खासदार उन्मेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे राहतील.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजक व निर्यात वाढीसाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना व प्रोत्साहने, निर्याती संबंधात बँकांची भुमिका व सहाय्य, निर्यातीसंबंधी विविध टप्पे व प्रक्रिया इत्यादींबाबत विविध तज्ञ, संबंधित शासकीय विभाग आणि बँका आदींचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दंडगव्हाळ यांनी केले आहे.