जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला विक्रमी ५ हजार रूपयांच्यावर भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता गेल्या चार पाच दिवसापासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याची स्थिती आहे. जवळपास १२०० ते १३०० रुपयांची क्विंटलमागे घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
हे आहेत घसरणीचे कारण?
काल गुरुवारी बाजार समितीत कांद्याला ४१८५ रूपये भाव मिळाला. दरम्यान, केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात 800 डॉलर प्रति टन किंमत केली आहे. तसेच सरकारनं नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला आहे. हा कांदा 25 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा हा परिणाम कांद्याच्या दरांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नविन कांद्याची आवक नसल्याने व जूना कांदा संपण्यास आल्याने कांद्याच्या दरात गेल्या १५ दिवसांपासून तेजी निर्माण झाली होती. २ हजार रुपयांवर असलेले कांद्याचे दर ५ हजारांच्यावर गेले होते. २७ रोजी चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला विक्रमी असा ५३२७ रूपये क्विंटल भाव मिळाला होता.
मात्र गेल्या आठवड्यात कांद्याने उसळी घेतली असतांना आता मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याची स्थिती आहे. येथील बाजार समितीत बुधवारी कांद्याची ७०० क्विंटल आवक झाली. तर ४४७७ रूपये भाव मिळाला.यादिवशी सरासरी ३१०० रूपये भाव मिळाला.तसेच गुरुवारी जुना कांद्याची 6३ वाहने आली होती. दिवसभरात ६३० क्विंटल आवक झाली. त्याला िकमान १५४० तर कमाल ४१८५ रूपये क्विंटल असा दर मिळाला. सरासरी २८८६ रूपये असा दर होता. गेल्या पाच दिवसात ५ हजार क्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारण ३० लाख रुपयांचा तोटा झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कांद्याच्या दरात तेजी आली असतांना दुसरीकडे किरकोळ बाजारात देखील कांदा ५० ते ७० रूपये किलोपर्यंत पोहचला होता. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर ग्राहकांची घालमेल अशी स्थिती होती.