गुन्हेभडगाव

सून आणि व्याह्याच्या त्रासाला कंटाळून मुलाच्या वडिलाचे धक्कादायक पाऊल, भडगावातील मनाला चटका लावणारी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 7 जानेवारी 2023 : भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे. नातवांच्या प्रेमापोटी व मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापास मुलाच्या सासरच्या मंडळींनी सतत अपमानित केले. या त्रासाला कंटाळून अखेरीस बापाने आत्महत्या केली. याबाबत त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख केला आहे. यात सुनेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव मालजी पाटील (७३, रा. जुवार्डी) असे या आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिस दलात त्यांचा मुलगा योगेश पाटील हा फौजदार आहे.

योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी छाया पाटील, सासरे गोटू पाटील, सासू संगीता पाटील, शालक किरणकुमार पाटील, शशिकांत पाटील यांनी धक्के मारून बाहेर काढले. वेळोवेळी आपल्या वडिलांना अपमानित केले. या अपमानाला कंटाळून वडील भीमराव पाटील यांनी विष प्राशन केले. याबाबत वरील पाचही जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शशिकांत पाटील (२३) यास अटक केली आहे. चार जण फरार आहेत. तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस जुवार्डीतील घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत भीमराव पाटील यांच्या खिशात त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन चिठ्ठया सापडल्या. त्यामध्ये मयत भीमराव पाटील यांनी नमूद केले आहे की, जुवार्डीतील गोटू पाटील, संगीता पाटील यांना भेटलो व माझ्या मुलाचा संसार मोडू नका, अशा विनवण्या केल्या; परंतु त्यांनी मला धक्के मारून बाहेर काढले. अपमानित झाल्याने वडिलांनी असा टोकाचा निर्णय घेतला असल्याची फिर्याद मुलगा योगेश पाटील यांनी पोलिसांत ३ रोजी दिली आहे. अटकेतील आरोपीस आधी पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button