शेत पाहायला गेलेल्या दोन तरुणांच्या दुचाकींला भीषण अपघात ; एकाच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । रस्ते अपघाताचे प्रमाण थांबता थांबत नसून दिवसेंदिवस यात वाढ होत चालली आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशातच शेत पाहायला गेलेल्या तरुणांच्या दुचाकींचा भीषण अपघात झाला. यात एकाच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगावच्या रामदेववाडी जवळ घडलीय.
निलेश गोकुळ पाटील (वय २५, रा. राम मंदिर, मेहरूण, जळगाव) असं अपघातातील मृत तरुणाचे नाव असून महेश रविंद्र खोरपडे (वय ३०, पाणीपुरवठा कार्यालय परिसर, मेहरूण, जळगाव) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
निलेश व महेश हे दोघे जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शेत पाहायला गेले होते. सायंकाळी वावडदा येथून जळगावी येत असताना रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील याचे पश्चात वडील, १ भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.