जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथील संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीच्या अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधील एक तरुण चोरीची महागडी बुलेट स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने अजिंठा चौफुली येथे सापळा रचून लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन उभा असलेला एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने साजीद खान असे सांगितले.
बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. पोलिसांनी तात्काळ बुलेटच्या चेसीस नंबरची ऑनलाइन तपासणी केली असता, ती बुलेट पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे साजीद खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तपासात या दोन्ही बुलेट पुणे शहरातील चंदननगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून, आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका गणेश शिरसाळे करत आहेत.