जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीच्या आधीच लोकांच्या खिशावरचा बोजा वाढला आहे. तुमच्या घराच्या स्वयंपाकघरापासून ते हॉटेल-रेस्टॉरंटपर्यंतचे बिल वाढणार आहे. तुमचे घराचे बजेट जसजसे वाढत जाईल तसतसे हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील तुमच्या खाण्याच्या बिलांवरही परिणाम होईल. दिवाळीत पदार्थांच्या चवीमुळे आता खिशावरचा भार वाढणार आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा व करडई तेल सर्वाधिक महाग असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य, मजुरी काम करणारा वर्ग, गरीब कुटुंबावर ऐन दिवाळीत महागाईचे संकट ओढवले आहे.
दिवाळीत चिवडा, चकली, शेव यासह इतर पदार्थ तयार केले जात असतात. पदार्थ तयार करताना तेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यात दिवाळीच्या तोंडावर तेलाचे दर वाढल्याने महिलांच्या किचनचे आर्थिक गणित बिघडले आहे. दीड ते दोन महिन्यापूर्वी सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाचे दर बहुतांश नियंत्रणात होते. त्यानंतर मात्र सतत दरवाढ होत गेली आणि सध्या तेलाचे दर २५ टक्क्यांनी वधारले आहे.
असे आहेत प्रति किलो तेलाचे दर
तीळ तेल – २४० ते २४५
शेंगदाणा तेल- १९५ ते २००
सूर्यफूल तेल- १४४ ते १४८
पाम तेल – १३५ ते १४०
सोयाबीन तेल- १३८ ते १४२
हे आहेत दरवाढीचे कारण?
कच्च्या सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात वाढ हे खाद्यतेलाच्या किमती वाढण्याचे कारण आहे. आयात शुल्कात वाढ झाल्याने किमतीवर परिणाम दिसून आला आहे. 14 सप्टेंबर रोजी सरकारने क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क वाढवून 27.5 टक्के केले. त्याचवेळी रिफाइंड तेलावरील आयात शुल्क 35.7 टक्के करण्यात आले. भारत आपल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या गरजेपैकी 58% आयात करतो. त्यामुळे आयात शुल्कात वाढ झाल्याचा परिणाम भावांवर होऊ लागला आहे.