जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । मागील काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपासाठी बैठकांचा सपाटा लावला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
याबाबत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.