गुरूवार, जून 8, 2023

आता नवीन रस्त्यावर होणार नाही खोदकाम ! हे आहे कारण

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या नव्या रस्त्यांवर महापालिका खोदकाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याची परिस्तिथी खूप खराब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा अनुभव नागरिकांना वेळोवेळी येत आहे. मात्र यावर आता पर्याय निघाला आहे.

आता महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची रस्ता तयार करण्याआधी संयुक्त बैठक होणार असून, इतिवृत्तही नोंदले जाणार आहे.ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. स्वतः जिल्हाधिकारी त्यांच्या अथवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही बैठक घेणार आहेत. त्यामुळे नव्याने तयार होत असलेल्या रस्त्यांवर जेसीबी चालविणे बंद होईल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

गेल्या काही वर्षांत जळगाव शहरातील रस्त्यांची अक्षरश:चाळणी झाली आहे. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयार गटार योजनेसाठी अख्ख्या जळगाव शहरातील रस्ते खोदले गेले. बऱ्याच ठिकाणी नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकणे, जोडकाम, व्हॉल्व्ह जोडणी अशा विविध कामांसाठी या तयार रस्त्यांवर खोदकाम सुरूच आहे. याशिवाय, भुयारी गटार, चेंबर दुरुस्ती या कामांसाठीही रस्ते खोदले जात आहेत.

सध्या ४२ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या विविध रस्यांवर मनपाने जवळपास ५५ ठिकाणी खोदकाम केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदार एजन्सी या तीनही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने हा प्रकार होत असून, त्यामुळे नाहक नागरिक हैराण होत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही नव्या रस्त्याचे काम हाती घेण्याआधी या तीनही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होईल. बैठकीचे इतिवृत्त नोंदले जाईल. त्यात तीनही यंत्रणांनी ‘ओके’ दिल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे ठरले आहे. जिल्हाधिकारी स्वतः या व्यवस्थेवर लक्ष ठेवून असतील..