जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ । गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन भूसंपादित करण्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली आहे. यात रावेर व यावल तालुक्यातील सुमारे १ हजार ५० शेतकऱ्यांकडील तब्बल ३४२ हेक्टर क्षेत्रांवरील जमीन संपादित होइल.

या परिसरातील जमीन भूसंपादित होणार?
वाघोदा, कोचूर, वडगाव, विवरे बु, विवरे खुर्द, रावेर, अजंदे, नांदुरखेडा, तामसवाडी, बोरखेडा, पुनखेडा, पातोंडी, खिरवड, वाघोड, खानापूर, अजनाड व चोरवड ही गावे व त्या परिसरातील जमीन भूसंपादित होणार आहे.

फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातर्फे भूसंपादनाबाबत वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील ५०० ते ५५० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात हरकती नोंदविल्या होत्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने चोपडा व यावल तालुक्यातील निर्देशित केलेल्या शेत गट नंबरसह रावेर तालुक्यातील १ हजार ५० शेतकऱ्यांचे ३४२.७८४ हेक्टर भू संपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिनियम १९५६ च्या कलम ३ (क) अन्वये केंद्र सरकारच्या राजपत्रात दि १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले आहे.




