2000 च्या नोटा जमा करण्यासाठी फॉर्मची गरज आहे का? SBI ने परिपत्रक जारी करून शाखांना दिले ‘हे’ निर्देश..
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । दोन दिवसापूर्वीच RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता लोकांकडे असलेली 2000 रुपयांची नोट पुन्हा बँकांमध्ये जमा करावी लागणार आहे. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
मात्र या नोटा जमा करण्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागणार असल्याचे सांगितलं जात आहे. अशातच देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ने एक परिपत्रक जारी करून सर्व शाखांना निर्देश दिले आहेत की एका वेळी 2000 किंवा 20,000 रुपयांच्या 10 नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही.
याशिवाय इतक्या नोटा बदलण्यासाठी लोकांना कोणतेही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही. एसबीआयने जारी केलेल्या सूचनांमध्ये, शाखा व्यवस्थापकांना नोट बदलण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
चार वर्षांपासून नोटा छापल्या गेल्या नाहीत
2000 रुपयांच्या नोटांची छपाई 2018-19 मध्येच बंद करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा ट्रेंड बराच कमी झाला आहे. सध्या चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या फक्त 10 टक्के नोटा आहेत. 2018 च्या मार्चमध्ये ते 31 टक्क्यांच्या जवळ पोहोचले होते. नोटाबंदीनंतर बाजारात रोख रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी 2000 रुपयांची नोट बाजारात आली. सुरुवातीला लोकांनी त्याचा वापर केला पण हळूहळू 2000 ची नोट बाजारातून गायब झाली.