⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाण्याच्या शोधार्थ नीलगाय पोहचली थेट मानवी वस्त्यांकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । ऐन उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्य प्राण्यांच्या प्रश्न गंभीर झाला आहे. जंगलातील वन्य प्राणी मिळेल ‘त्या’ ठिकाणी पाण्याच्या शोध घेत असून तहानेने व्याकुळ झालेला एक नर जातीचा नील (सांबर) थेट पाण्याच्या शोधात सुकळी गावात येऊन पोहचला. दरम्यान, जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने तसेच या भागातील कृत्रिम पाणवठेही कोरडे असल्याने वन्य प्राण्यांना पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. वनविभागाने जंगलात बांधलेल्या कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकावे तसेच आणखी पाणवठे तयार करुन त्यात पाण्याची सोय कारवी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वडोदा वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील जंगलातील नर जातीचा नील हा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास थेट सुकळी येथील ग्रा.पंचायत सदस्या शारदा कोळी यांच्या घरासमोर आल्याने हा प्रकार लक्षात आला. मात्र, तोपर्यत कुत्र्यांनी त्याला घेरुन “सळो की पळो” करुन सोडले व पाठलाग चालू केला. ग्राम पंचायत सदस्य नितीन पाटील, ग्राम पंचायत शिपाई रविंद्र कोळी, वासुदेव बाविस्कर, दिलीप पाटील, नामदेव धनगर, दिपक कोळी आदी काही ग्रामस्थांनी नीलची कुत्र्यांच्या तावडीतुन सुटका करुन त्याला जंगलाच्या दिशेने परत पाठविण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तास गावठाण परिसरात कुत्र्यांनी नीलगायला घेरले होते. अखेर ग्रामस्थांच्या सहकार्याने कुत्र्यांपासुन सुटका करत नील जंगलात जाण्यात यशस्वी झाला.

घटनेची माहीती मिळताच वनपाल पी.टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विकास पाटील, वनरक्षक जी.बी.गोसावी, वनमजुर संजय सांगळकर, अशोक पाटील, योगेश कोळी दाखल झाले व आजुबाजूच्या परिसरात नीलगायचा शोध घेतला मात्र, नील मिळुन आला नाही.