⁠ 
सोमवार, मे 20, 2024

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची देयके थकवली : निलेश वर्मा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२४ । शहरात २७ जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसार कामी व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात म्हणून प्रसिद्ध करण्याचे त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तोंडी आदेश दिले होते. हे काम झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी याची देयके अदा करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप निलेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

निलेश वर्मा म्हणाले की, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शासन आपल्या दारी कार्याक्रमाच्या प्रसिध्दीसाठी व्हिडिओची निर्मिती केली आणि त्यास वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवले तसेच संबंधित माध्यमांना त्या जाहिरातीचे शुल्क देखील तात्काळ स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने अदा केले. कार्यक्रम झाल्यावर आम्हाला बिल जमा करण्यास सांगण्यात आले त्यानुसार आम्ही रितसर बिल जमा केले. मात्र, त्याच दरम्यान अमन मित्तल यांची बदली झाली. तेंव्हापासून आमची देयके मिळाली नसल्याचे श्री.वर्मा यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत. तसेच कार्यक्रम माझ्या कार्यकाळात झालेला नसल्याने व अमन मित्तल यांनी प्रशासकीय मान्यता न घेता आदेश दिलेले असल्याने बिल कधी मिळतील सांगता येत नाही, असे उत्तर दिले. यासंबंधी मी मुख्यमंत्री कार्यालयास मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आपली तक्रार रेवेन्यू डिपार्टमेंटला फॉरवर्ड करण्यात असल्याचे उत्तर मिळाले. याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला मात्र त्याचाही फायदा झाला नसल्याचे श्री.वर्मा म्हणाले.

माझे १ जून रोजी नवीन ऑफिसमध्ये स्थलांतरित झालं आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम या कार्यक्रमासाठी वापरली. मात्र, आठ महिने होऊन सुद्धा बिल मिळत नसल्याने कर्जावरील व्याज आणि पेनल्टी वाढली असून मी व्यावसायिक संकटात अडकलो आहे. ऑफिस खर्च, घर खर्च, बँकेचे हप्ते, मुलींचे शिक्षण, आईचे आजारपण इत्यादी समस्यांना तोंड देताना अनेक वेळा आयुष्याचा प्रवास संपवण्याचा विचार मनात येतो. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्व नेते मंत्री आणि अधिकारी जबाबदार असल्याचे निलेश वर्मा यांनी म्हटले आहे.