जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आज बुधवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज असला तरी उन्हाचा चटका मात्र कायम आहे. असह्य करणारा उकाडा जाणवत असून यामुळे जळगावकर हैराण झालाय. यातच उद्या गुरुवारपासून जिल्ह्यात काही दिवस उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याचाही अंदाज आहे.
यंदा एप्रिल महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ४२ अंशांच्या पुढेच राहिला होता. मात्र, १० मेनंतर वातावरणात बदल होऊन, दुपारपर्यंत कडक ऊन व त्यानंतर, मात्र ढगाळ वातावरण अशी स्थिती काही दिवसांपासून निर्माण होत आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सकाळी कडाक्याचे ऊन व दुपारी ३ वाजेनंतर वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसासोबतच गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र उद्यापासून उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे.
१६ मेनंतर वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. १६ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. २५ मे नंतर मात्र जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पंधरवड्यात कडाक्याचे ऊन व पाऊस अशी स्थिती जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे
आगामी पाच दिवस असे राहणार तापमान
१५ मे रोजी तापमान ४० अंशपर्यंत तर दुपारनंतर वादळी पावसाचा अंदाज
१६ मे रोजी तापमान ४१ अंशपर्यंत तर वातावरण काही अंशी ढगाळ राहील
१७ मे रोजी तापमान ४२ अंशपर्यंत तर वातावरण सकाळी कोरडे व सायंकाळनंतर ढगाळ
१८ मे रोजी तापमान ४३ अंशपर्यत तर कोरडे वातावरण
१९ मे रोजी ४३ अंशपर्यंत तर कोरडे वातावरण