⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अचानक जळगावात ; कारण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी माजी आमदार संतोष चौधरी यांनी मात्र नाराजी व्यक्त करत बंड पुकारण्याचा इशारा दिला असल्याने महाविकास आघाडी पुढे घरचेच आव्हान उभे राहिले आहे. या सगळ्या अडचणी मधून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगावात दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी इतर सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला.

महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला गेली. रावेरमधून निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी इच्छूक होते. परंतु या ठिकाणी भाजपमधून एका दिवसापूर्वी आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी नाराज आहेत. त्यांनी बंडाचा इशाराही दिला आहे. याच दरम्यान, जयंत पाटील जळगावात आले असून ते एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक घेत आहेत.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परंतु ज्या उमेदवारासाठी बैठक घेत आहेत ते रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील बैठकीला सर्वात शेवटी उशिराने पोहोचले. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सुद्धा बैठकीला हजर असल्याने चर्चा आहे.