जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानतंर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात. पैशांच्या ताकदीचे घमंड असल्यानेच ते करत आहेत.त्याचा वापर मतदान काळात केला जात असल्याने एकप्रकारे लोकशाहीला तळा जातो. परंतु, लढत ही लोकशाहीच्या माध्यमातून झाली तर खरी ताकद जनतेसमोर येईल; असा निशाणा रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर साधला.
दरम्यान, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे परिवाराची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. भाजपमध्ये असताना तेव्हाच त्यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्यांनी केले. शिवाय जळगाव जिल्हा परिसरात देखील भाजप नेते त्यांची ताकद वाढविण्यासाठी बहुजन समाजाच्या मोठ्याची ताकद कमी करण्याचे काम करत आहे. त्याचा भाग म्हणजे ईडीची चौकशी आहे.
महाराष्ट्रातच ईडी नव्हे तर बाहेरच्या राज्यात देखील ईडीची कारवाई सुरू आहे. हे लोकशाहीला सोडून असून सुडाचे राजकारण केले जात असल्याची टीका देखील पवार यांनी केली. तसेच चौकशीवर ईडी काहीच बोलत नसून भाजपचे काही नेते समोर येवून चौकशीबाबत ईडीचा पुरावे दिल्याचे बोलत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले..