जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२६ । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी सक्तीचे केल्यानंतर लाभार्थी संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. तांत्रिक त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे आणि कठोर छाननीमुळे लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सुरुवातीला सुमारे 2 कोटी 40 लाख महिलांनी अर्ज केले होते. मात्र ई-केवायसी अनिवार्य केल्यानंतर लाभार्थींची संख्या थेट 1 कोटी 60 लाखांवर आली आहे. म्हणजेच तब्बल 86 लाख महिलांची नावे योजनेतून वगळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता केवळ पात्र ठरलेल्या महिलांनाच मिळाला.

दरम्यान, राज्यावरील वाढते कर्ज आणि निधीची कमतरता यामुळे जानेवारी महिन्याचे मानधन रखडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.

सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत दोन कोटी 40 लाख महिलां पैकी केवळ एक कोटी 90 लाख महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील ज्या महिलांचे तपशील अचूक होते, अशा साधारण एक कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा लाभ मिळू शकला. म्हणजेच, निव्वळ तांत्रिक अज्ञानामुळे किंवा प्रक्रियेतील क्लिष्टतेमुळे 86 लाख ‘लाडक्या बहिणी’ हक्काच्या 1500 रुपयांपासून वंचित राहिल्या आहेत.
सरकारकडून पात्र महिलांना अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यातील हप्तासुद्धा अद्याप मिळाला नाही. त्यातच ही आकडेवारी समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे.
मात्र, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक देण्यासाठी लाभ सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास बुधवारी मान्यता दिली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण ३,९६० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र महिलांना लवकरच जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे










