मेहरूण स्मशानभूमीजवळील नालेसफाईला सुरवात
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । येथील प्रभाग समिती 3 मधील मेहरुण स्मशानभूमीजवळील नाला सफाईसह, नाल्याचे खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाला आज सकाळी महापालिकेतर्फे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांना पावसाळ्यापूर्वी नियोजन करुन तातडीने स्वच्छता करण्याचे आदेशही महापौर व उपमहापौरांतर्फे देण्यात आले.
महापालिका आरोग्य विभागांतर्गत प्रभाग समिती 3 चे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, आरोग्य निरिक्षक लोमेश धांडे व एस.बी. बडगुजर यासह पालिकेचे कर्मचारी व नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक रियाज बागवान, सलमान खाटिक, आशुतोष पाटील, उमेश सोनवणे तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की महापालिकेद्वारे मागील आठवड्यातच पावसाळापूर्व नियोजनांतर्गत शहरातील विविध लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईसह तेथील गाळ काढून, त्यांचे खोलीकरण करुन नाल्यांना प्रवाही करण्याच्या कामाला सुरुवात झालेली होती. याच पार्श्वभूमीवर मेहरुण परिसरातील सांडवा तसेच या भागातील गटारींचे पाणी ज्या नाल्यात जाऊन मिळते त्या प्रभाग समिती 3 मधील मेहरुण स्मशानभूमीजवळची नालेसफाईचे व खोलीकरणाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे.
यामध्ये संबंधित नालेसफाईसह त्यातील गाळ, प्लास्टिक पिशव्या, कचरा, झाडेझुडपे काढून ते प्रवाही केले जातील. त्यानंतर संबंधित नाल्यांत डास, मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके टाकून फवारणीही केली जाईल.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी परिसरात ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांच्याशी चर्चा करून स्वच्छतेचे आदेश दिले. तसेच नाल्याकाठच्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आस्थेवाईकपणे चौकशी करीत पावसाळ्याच्या काळात काळजी घेण्याचे सांगितले. तसेच स्वच्छतेसंदर्भात काहीही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संपर्काचे आवाहन केले.