जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी हत्याची घटना समोर येत असून अशातच अमळनेर तालुक्यातून हत्येची घटना समोर आलीय. ज्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

ही घटना पैलाड येथील हेडावे नाक्यावर घडली असून मुकेश भिका धनगर (३८, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. निखिल विष्णू उतकर (४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) असं आरोपीचं नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

या घटनेबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील पैलाड येथील मुकेश घराबाहेर गेला असता हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचे आरोपीशी वाद सुरू झाले. यात आरोपीने दगड उचलून मुकेशवर वार सुरू केले. दिनेश भिका धनगर (39) हा त्यांच्यातील भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही आरोपीने दगड मारल्याने तो घराकडे जाऊन मदत बोलवायला गेला. दरम्यान जखमी अवस्थेत मुकेशला दवाखान्यात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, आरोपी निखिल विष्णू उतकर हा नाशिक येथील रहिवाशी असून तो गेल्या काही दिवसापापासून शहरात वेडसर म्हणून फिरत असल्याचं बोललं जात असून या घटनेनंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. मुकेश याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. खुनाच्या घटनेनं मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.









