अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद; अर्चना राणे यांचा पुढाकार
जळगाव लाईव्ह न्यूज । मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी शाळांची सद्यस्थिती मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष खेळ आज जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी स्वत: थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी अर्चना राणे यांच्या विशेष सहकार्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुरड्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.


चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठरला तो म्हणजे चित्रपटातील कलाकारांची भेट. प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा” असा मोलाचा संदेश यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.

खाऊ आणि शीतपेयांची मेजवानी
अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांचीही सोय करण्यात आली होती. चित्रपटाचा आनंद घेतानाच खाऊ मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार
“मराठी भाषा तर आता अभिजात झाली, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा ज्वलंत प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने अर्चना राणे यांचे मनापासून आभार मानण्यात आले.




