जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध प्रकारे गंडा घातला जात असून या घटना काही केल्या थांबताना दिसत आहे. अशातच सायबर गुन्हेगारांनी मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची ६.१७ लाख रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्याचे पपई व कापसाच्या आलेले पैसे भामट्याने दोन दिवसात लंपास केले आहे.

कशी झाली फसवणूक?
महेंद्र घोडू जाधव (वय ४२, रा. आडगाव, ता. चोपडा) या शेतकऱ्याला ८ मार्च रोजी घरी असताना फोन आला. त्याने बँक ऑफ महाराष्ट्रमधून शर्मा बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट नसल्याने बँक खाते बंद पडले असे सांगितले. त्यावर महेंद्र जाधव बँकेकडून असे कॉल येत नाही व बँकेत जावून केवायसी करून घेईल असे सांगितले. त्यावर याने मी हेड ऑफिसमधून बोलत आहे. तुम्हाला केवायसी करायची असेल तर बँकेत रजिस्टर असलेल्या मोबाइलवर एक लिंक पाठवतो त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरायची आहे.
तुम्हाला कोणताही ओटीपी देण्याची गरज नाही असे सांगून फोन कट केला. बराच वेळ झाल्यानंतर जाधव यांनी कॉल आला नाही म्हणून परत कॉल केला. त्यावर त्याने टेक्स मेसेजवर लिंक येत नाही. तुमचा व्हाट्सअप क्रमांकावर लिंक पाठवतो. त्यानुसार त्याने लिंक पाठवली. त्यावर क्लिक करून त्याचे सांगण्यानुसार माहिती भरली. खाते क्रमांक माहित नसल्याचे सांगितल्यावर त्याने रजिस्टर मोबाइल क्रमांक भरण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्ड क्रमांक व पीन टाकण्यास सांगितले. ते टाकल्यानंतर त्याने मोबाइलवर लिंक आली असेल असे सांगितले. त्याप्रमाणे लिंक आली त्यावर क्लिक केले. त्यावर शर्मा नाव सांगणाऱ्याने केवायसी अपडेट करीत आहे त्याला वेळ लागेल. थोड्या वेळाने तुमच्या मोबाईलवर १२ अंकी क्रमांक येईल. तो केवायसी झाल्याचा आयडी असेल. त्यानंतर बँकेचा मेसेज येईल असे सांगून फोन बंद केला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.