जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाकांशी योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अशातच आणखी एक योजना बंद करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ या लोकप्रिय योजनेलाही ब्रेक लागल्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चांगलीच गाजली होती. या योजनेला सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला ब्रेक लागला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवासासाठी कधी बोलावले जाणार, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे ही योजना बंद पडली का? असा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे हजारो ज्येष्ठांचे तीर्थयात्रेचे स्वप्न अधांतरी राहिले आहे.

यापूर्वी ‘माझी शाळा’, ‘आनंददायी शाळा’, ‘आनंदाचा शिधा’ यांसारख्या योजनांबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच तीर्थ दर्शन योजनेबाबतची अनिश्चितता राजकीय वातावरण तापवणारी ठरत आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विरोधक दोघेही सरकारकडून स्पष्ट भूमिकेची अपेक्षा व्यक्त करत आहेत.









