⁠ 
बुधवार, मे 8, 2024

डोहाळ्याच्या कार्यक्रमातून परताना भीषण अपघात ; 14 जणांचा मृत्यू, 21 जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । मध्य प्रदेशातील दिंडोरी येथून एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. बारझार घाटात अनियंत्रित पिकअप व्हॅन दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 ही दुर्देवी घटना बुधवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमाही देवरी गावातून मसुरघुगरी पोलीस स्टेशन परिसरात गेले होते.

कार्यक्रमाहून परतत असताना बुधवारी रात्री दिंडोरी जिल्ह्यातील बडझर घाटात अचानक पिकअपचा ब्रेक फेल झाल्यांनतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले काही क्षणातच पिकअप २० फूट खोल दरीत जाऊन उलटला. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याशिवाय स्थानिकांनीही तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने दिंडोरी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तर जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.