जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । अमळनेर आगाराची बस इंदौरहून परतत असतांना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास खरगोन आणि धार दरम्यान पुलावरून नर्मदा नदीत कोसळली. जळगाव जिल्हा विभाग नियंत्रक आणि जिल्हधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील याबाबत आढावा घेतला आहे. दरम्यान, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार पुलावरील मोठा खड्डा चुकविताना हा अपघात झाला असावा किंवा एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना पुलाचे रेलिंग तुटून बस नर्मदा पात्रात कोसळली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे ब्रेक फेल होऊन बस कोसळल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.
जळगाव जिल्हा प्रशासन सतत खरगोन आणि धार प्रशासनाच्या संपर्कात असून जखमींना उपचारार्थ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमळनेर आगाराच्या या बसवर चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक क्र. १८६०३) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (८७५५) हे होते. परंतु, त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. या अपघातात आता मृतांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
बस सकाळी साधारण ८ वाजता इंदौरवरुन निघाली. आग्रा-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदौर महाराष्ट्राला जोडतो. अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून इंदूर ८० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या पुलावरुन ही बस कोसळली तो पूल धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमध्ये ५५ प्रवासी होते त्यापैकी १३ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बसला अपघात ज्या ठिकाणी त्या ठिकाणापासून १२ किलोमीटर आधी सकाळी ९ ते ९.१५ दरम्यान त्या बसमधील प्रवासी दुधी बायपासच्या काठी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी या बसमधील १२-१५ प्रवाशांनी चहा घेतला. बाकीचे प्रवासी बसमध्ये होते. या बसमध्ये साधारण ३० ते ३५ प्रवासी बसमध्ये होते असा अंदाज हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे. खड्डा चुकविताना किंवा ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे देखील समोर आले आहे. अद्याप या वृत्ताला ठोस असा दुजोरा मिळालेला नसल्याने नेमके कारण सांगणे कठीण आहे.