जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । मन हेलावून टाकणारी एक घटना अमळनेर तालुक्यातील निम येथे घडली. आपल्या डोळ्यादेखत मुलाचे लग्न व्हावे; अशी इच्छा प्रकट करणारी आईने मुलाच्या हळदीच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला. छातीवर दगड ठेवून नातेवाईकांनी मुलाचे लग्न लावून आईची ईच्छा पुर्ण केली.
अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी सरलाबाई गुलाब गुर्जर यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगीच लग्न झाले आहे. मुलगा बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, आई सरलाबाई यांनी प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे मुलाचे लग्न माझ्या डोळ्यादेखत व्हायला हवे; म्हणून पती गुलाब गुर्जर यांचाकडे इच्छा व्यक्त केली.
यानुसार गुलाब गुर्जर व भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा बांधकाम अभियंता असलेल्या राकेशसाठी मंगरूळ (ता. चोपडा) येथील अशोक गंगाधर पाटील यांची मुलगी रोहिणी हिच्याशी विवाह निश्चीत केला. त्यानुसार ३ मेस हळद व ४ मेस विवाह सोहळा नियोजित केला.
लग्न दोन दिवसांवर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला. यामुळे अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. हळदीचा दिवस उजाळला. ३ मेस देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जायला सांगितले.
यानंतर मुलाला हळद लागत असताना व्हिडीओ कॉलने पाहून पाणी मागितले. शेवटी हळद लागली पाहून सरलाबाई डॉक्टरांनी सांगितले की आता माझी इच्छा पूर्ण झाली, मला चिंता नाही म्हणून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्या कायमच्या निघून गेल्या. रुग्णालयात नातेवाईक व कुटुंबिय, गावातील भावबंध यांना सरलाबाईच्या निधनाची बातमी दिली. मात्र विवाह सोहळा नियोजित असल्याने सरलाबाईच्या निधनामुळे छातीवर दगड ठेवून सरलाबाईंची इच्छा पूर्ण करत हृदयात दुःख साठवून लग्न सोहळा पार पाडला. मात्र लग्न लागल्यावर राकेशने टाहो फोडत आई तुझी इच्छा पूर्ण केली. मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली म्हणून हंबरडा फोडला. शेवटी वडील, काका व नातेवाईकांनी धीर देत सरलाबाईचा मृतदेह गावी आणून गावी अंत्यसंस्कार केले.