जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । सध्या जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय फोफावला असून, यापुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून आज पहाटे नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनासह थेट शहरापासून जवळपास असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात उतरत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी अनेक अधिकृत वाळू वाहून नेणारे जवळपास १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केल्याचे समजत आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मागील काही काळात गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात असल्याचे दिसून आले. मात्र याकडे महसूल खात्यासह पोलिसांनी अक्षरशः कानाडोळा केल्याचं दिसून आले. आधीच्या जिल्हाधिकार्यांच्या कार्यकाळात तर वाळू तस्कर मोकाट सुटले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू तस्करीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असेल असे सांगितले होते. यानुसार मध्यंतरी काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.
अशातच आज शनिवारी पहाटे दोन वाजेपासून नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनासह थेट गिरणा नदीच्या पात्रात उतरले. यासोबत हे पथक गिरणा पात्राला लागूनच असलेल्या बांभुरी गावात देखील दाखल झाले.
या पथकाने नदीपात्रासह गावात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि डंपर्स जप्त केले. येथून जवळपास १०० पेक्षा जास्त वाहने जप्त केल्याची माहिती असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, सकाळपासून देखील बांभोरी गावासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या कारवाईने वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.