⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

खुशखबर! दोन दिवसात मान्सून महाराष्ट्र्रात पोहोचणार, आज जळगावात असे राहणार वातावरण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । उष्णतेच्या झळांनी हैराण झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. ३० मे रोजी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचे महाराष्ट्रातील लोकांना वेध लागले असून अशातच येत्या मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच जळगावात आजपासून सात दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी उष्णता अधिक वाढत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. अशातच वेळेआधी केरळात पोहोचलेला मान्सून महाराष्ट्र्रात कधी दाखल होईल याची उत्सुकता सगळ्यांना लागली. यंदा ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला. यांनतर आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात ३ जून रोजी, तळ कोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर खान्देशात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांत आज आणि उद्या उष्ण आणि दमट वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा :
तर दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगाव कसे राहणार हवामान :
दरम्यान, गेल्या आठवड्यात ४५ अंशाचा टप्पा गाठणाऱ्या तापमानात मोठी घट झाली असून शनिवारी जळगावचे तापमान ४०.९ इतके होते. आज रविवारपासून पुढील सात दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान अभ्यासकांनी ४ ते ६ जून या तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.तर जळगाव जिल्ह्यात १५ जूननंतर नियमित मान्सून येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.