जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच ३० मेला केरळात दाखल झाला आहे. यानंतर मान्सून महाराष्ट्रासह खान्देशात कधी पोहोचेल याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, केरळाच्या टोकावर ३० मेस पोहोचला असला, तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जूनदरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. तर खान्देशात मॉन्सून १२ ते १५ जूनदरम्यान पोहोचू शकतो.
मात्र यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत आज शनिवार (ता. १) ते सोमवार (ता. ३)पर्यंत वारा-वादळासह गडगडाटी वळिवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा मान्सून वेळेआधी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून येणार तो लवकरच महाराष्ट्रात पोहोचेल. नाशिक व खान्देशात मॉन्सून १२ ते १५ जूनदरम्यान पोहोचू शकतो. त्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाच्या वळिवाच्या सरीही कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पेरणीसाठी अद्याप अवकाश
सध्याची एकंदरित वातावरणीय स्थिती पाहता, पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जूनपर्यंतही कदाचित वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. पेरणी होणार आहे, पण सध्याच्या या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अतिआत्मविश्वासावर, उगाचच धूळपेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करू नये, असे हवामान खात्याने कळविले आहे.