जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे.तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.दरम्यान, राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच यंदा १५ दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. राज्यात तसं पाहायला गेलं तर समाधानकारक पाऊस झाला. यंदा झालेल्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत तर अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावल्याचं चित्र आहे.
एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्यात दडी मारलेल्या पावासानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळं शेतकरी समाधानी झाले आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. १ सप्टेंबरपासून पाऊस हळूहळू वाढू शकतो. त्यामुळे तशा प्रकारे शेतीच्या कामाचे नियोजन करण्यात यावे असाही आवाहन हवामान खात्याने केले आहे.