जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठी आनंदवार्ता आहे. ती म्हणजे आज १३ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यानंतर 27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतेय. मात्र त्यापूर्वी देशातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग आण निकोबार बेटांमध्ये 13 मे रोजच दाखल झाला आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे.
पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे. २७ मे रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान आजपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत असल्याचं दिसत आहे. येत्या ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.