जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज रविवारी केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी 1 जूनला आगमन होत असते. यंदा मात्र, लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला असून मान्सून रविवारी केरळात दाखल झाला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटकरून दिली आहे. दरम्यान, पोषक वातावरण राहिले तर मान्सून 7 ते 8 जून पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
यंदा सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यानंतर केरळमध्ये तो २७ मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला होता, मात्र काही दिवसापासून मान्सून श्रीलंकेत खोळंबला होता. त्यामुळे 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनला विलंब लागला. दरम्यान, आज २९ मे रोजी केरळातील पर्जन्यमापकांची तपासणी केल्यानंतर हवामान विभाग या निकषावर पोहचला असून केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे.
दरम्यानं मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले असून हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये त्याचे तळकोकणात आणि महाराष्ट्रात आगमन होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर होणार असल्याचे संकेत आहेत. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याच प्रमाणे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात केरळात मान्सून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सक्रीय होईल यामध्ये शंका नाही.
मान्सूनचे आगमन तर आता झाले आहे. मात्र, यानंतर आता हवेचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आगमन जरी दणक्यात झाले असले तरी हाच वेग आणि वाऱ्याने जोर कायम राहिला तर मात्र, महाराष्ट्रातही वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल. पुढील दोन आठवडे जर मान्सूचा वेग कमी राहू शकतो, असं देखील हवामान विभागानं सांगितलं आहे. मात्र, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात 4 ते 5 जूनपर्यंत पोहोचू शकतो.