जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुने २०२३ । मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. केरळात मान्सूनचे आगमन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्याचे कारण म्हणजचे गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अचानक तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे.
आता कधी दाखल होणार मान्सून?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते १५ जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसहित विजांचा कडकडाट पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ७ आणि ८ जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.